केंद्रीय पथकाकडून चोपडा येथील कोविड सेंटरची पाहणी
चोपडा प्रतिनिधी :——-
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्गसह , उपाययोजनांबाबतचा आढावा केंद्रीय पथकाने घेतला असून चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरसह महात्मा गांधी कॉलेज मधील कोविड सेंटरला भेट दिली .

कोरोनाचा काळात प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाय योजना ,कोविड सेंटर मधील सुविधा आणि लसीकरण कशा पद्धतीने केल्या जात आहेत याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकातील जोधपुर एम्सचे डॉ श्रीकांत आणि भुवनेश्वर एम्सच्या डॉ अनुपमा बेहरे यांनी चोपडा येथील सेंटरला शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भेट दिली .
यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी सीमा अहिरे , आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुमित शिंदे , तहसीलदार अनिल गावित ,जिल्हा वैद्यकीय अधिकारी जमादार ,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर उपस्थित होते .
त्यात त्यांनी रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा उपचार याबाबत माहिती घेतली तसेच शहरातील विविध सेंटरमधील रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचाराची माहिती घेतली . यावेळी त्यांनी काही सूचना करून सुधारणा करण्यास सांगितले. जळगाव जिल्ह्यातील परिस्थितीच्या आढावा घेऊन सदर अहवाल केंद्र शासनास पाठविला जाणार असल्याचे सांगितले

**********************************
केंद्रीय पथकातील सदस्यांनी मिडियाशी न बोलता घेतला काढता पाय?
केंद्रीय पथकातील सदस्य डॉ श्रीकांत व डॉ अनुपमा व त्यांच्यासमवेत असलेले जिल्हा वैद्यकीय अधिकारी जमादार यांनी डॉ मनोज पाटील यांच्या बंद केबिनमध्ये जवळपास एक तास काय चर्चा केली ? सदर चर्चा – मार्गदर्शन – सूचना मात्र गुलदस्त्यातच आहे . बंद दरवाजातील मीटिंग संपल्यानंतर पथक जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांना मिडीयाने प्रश्न विचारण्याचे प्रयत्न केले असता त्यांनी मीडियाकडे दुर्लक्ष करत काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला . मात्र मिडियाने त्यांचा पाठलाग करून प्रश्नांचा भडिमार केल्याने आम्हाला मीडियासमोर बोलण्याची परवानगी नाही . सदर सुचनांचा अहवाल आम्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे देणार असल्याचे सांगून शेवटी काढता पाय घेतला . तद्नंतर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज पाटील यांना मीडियाने घेरले असता त्यांनी ही बोलण्यास टाळाटाळ केली .

जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग तीव्रतेने वाढत आहे . देशातील अन्य राज्यांमध्येही रुग्ण संख्या वाढत असून केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने ५० जिल्हे निश्चित करून तेथील आढावा व उपाय योजनांच्या दृष्टीने ५० पथकांची नियुक्ती केली आहे . चार दिवस मुक्कामी असलेल्या या पथकाने फिल्ड व्हिजिट करून नेमके काय साध्य होणार हे मात्र गुलदस्त्यातच आहे ?
***********************************
केंद्रीय पथकाच्या भेटीप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तुषार पाठक ,भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष गोपाल पाटील ,व्यापारी आघाडी माजी अध्यक्ष हेमंत जोहरी ,भारतीय जनता पार्टी तालुका संयोजक विजय बाविस्कर यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या विविध समस्या केंद्रीय पथकापुढे मांडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या समस्या ऐकून घ्यायला केंद्रीय पथकाकडे वेळ दिसून आला नाही .त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तुषार पाठक यांनी उपजिल्हा रुग्णालयाची आजची स्वच्छता व टापटीपपणा पाहून आश्चर्य व्यक्त केले , नेहमीच अस्वच्छता दिसून येणारे उपजिल्हा रुग्णालय मात्र आज केंद्रीय पथक येणार म्हणून स्वच्छतेने कळस गाठला होता . डॉक्टरांनी आतापर्यंत कोरोनाचा काळात कधीही पीपीई किट व हॅन्ड ग्लोज वापरले नव्हते पण आज केंद्रीय पथक येणार म्हणून डॉक्टरांसह नर्सेस , वॉर्डबॉय पीपीई किट घालून सज्ज होते . तसेच रुग्णांच्या बेडवर आज नव्या बेडशीट दिसून आल्या तसेच रुग्णांचे नातेवाईक डबे देण्यासाठी आलेले असताना त्यांना गेटबाहेर दीड ते दोन तास उन्हात ताटकळत उभे राहावे लागले त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी सुद्धा केंद्रीय पथकावर नाराजी व्यक्त केली तसेच केंद्रीय पथकाने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता नो कमेंट्स म्हणून काढता पाय घेतला त्यामुळे नेमकी काय पाहणी केली हे गुढ मात्र कायम आहे ?