सातपुड्यात लागलेला वणवा थांबता थांबेना
अब्जावधीची वनसंपदा होतेय खाक
चोपडा प्रतिनिधी : —-
चोपडा -यावल- रावेर परिसराला विस्तीर्ण असा सातपुडा पर्वत लाभला आहे . मात्र दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वसंत ऋतूची चाहूल लागताच या वनास वणवा लागण्याची दुर्दैवी मोहीम सुरू झाली असून हा वणवा कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतरही थांबता थांबत नसून वन विभाग हतबल झाला आहे . त्यामुळे खरंच सातपुडा वाचावा ही इच्छाशक्ती असेल तर अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन विशेष प्रयत्न करण्याची मागणी होत आहे .
अडावद वनक्षेत्र हद्दीतील पांढरी येथील कक्ष क्रमांक 194 मध्ये शुक्रवारी दुपारपासून जोरदार वणवा लागला असून दिवसा न दिसणारा हा वणवा रात्री मात्र वीस ते पंचवीस किलोमीटर वरून सहज दिसत होता .रात्रीसुद्धा सलग सुरू असलेला हा वणवा दऱ्याखोऱ्याच्या भागात असल्याने वनविभागाचे वणवा विझवण्याचे प्रयत्न तोडके ठरत होते. ज्यामुळे या वनातील अनमोल असे लाखो करोडो रुपयांची वनसंपदा जळून खाक होत असल्याने वन्य व निसर्ग प्रेमीमध्ये संताप व्यक्त होत आहे .तर हतबल वन विभागाने येथे कॉन्टर फायर करून वनवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र रात्री उशिरापर्यंत तो ही यशस्वी न झाल्याचे दिसून आले .

महाराष्ट्राच्या चोपडा यावल रावेर तालुक्यात निसर्गाने भौगोलिकदृष्ट्या अनमोल अशी देणगी लाभलेल्या सातपुडा जंगलाच्या जंगलावर जंगल तस्करांची वक्रदृष्टी पडली आणि चोपडा तालुक्याच्या जंगल भुईसपाट होण्यास सुरुवात झाली , चोपडा तालुक्याच्या अडावद व वरगव्हाण परिमंडळात गेल्या आठ दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणी वणवा लागून आगीत लाखो नव्हे करोडो रुपयांची अनमोल अशी वनवृक्ष व खनिज संपत्तीची वन्यजीवांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत .

जंगलातील विस्तीर्ण असे वनपट्टे नष्ट होत आहेत , काल तब्बल वीस ते पंचवीस एकर भागात एकाच वेळी अनेक ठिकानी वणवा पेटला होता हे चित्र पाहून वन्य प्रेमी हैराण झाले आहेत
यामुळे अब्जावधीची अनमोल अशी वनसंपत्ती व वनस्पती ,पाखरू , पक्षी जळून खाक होत आहेत .तर वनकर्मचारी एका ठिकाणीचा वणवा विझवत नाही तोवर दुसर्या ठिकाणी वणवा लागतो त्यातच अपूर्ण सुविधा त्यामुळे तेही हतबल ठरत असून खरोखर सातपुडा वाचवायचे असेल तर अधिकारी व लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवून ठोस उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे अन्यथा पुढील काही दिवसात सातपुडा जंगल इतिहास जमा होण्यास वेळ लागणार नाही . वारंवार लागणाऱ्या वणवामुळे लाखो एकर क्षेत्रावरील वनसंपदा जळून खाक झाली आहे तर येथील प्राण्यांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे ,एवढ्या भयावह वनवा बद्दल वनविभाग सुस्त दिसून येत आहे , अद्याप एकही कारवाई करण्यात आलेले नाही .

वनविभागाच्या हद्दीत सातपुड्याचे मोठे वनक्षेत्र आहे त्यात औषधी वनस्पती आहेत . दरवर्षी वनविभागाकडून लाखो रुपये खर्चून वृक्ष लागवड केली जाते मात्र शासकीय निधीचीही राख होत आहे .वणवा लागल्याने वृक्षराजी बहरते हा गैरसमज आहे .यावल वन विभागांमध्ये वना लगतच्या गावांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्या आहेत तरीही वणवे नेहमी लागत आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे . जंगलांना आगी लावण्याचे प्रकार होत आहेत या जंगलात असलेल्या प्राणी पक्ष्यांच्या नाहक बळी जात आहेत , घरट्यातील पिल्ले वन्यप्राण्यांची नवी पिढी जळून खाक होत आहे ,हे सर्व अतिशय भयावह व मन हेलावणारी गोष्ट घटना घडत आहेत तरी अधिकारी पदाधिकारी यांनी जातीने लक्ष घालून नेहमीच होणाऱ्या षडयंत्रास कायमस्वरूपी थांबविले पाहिजे तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचारी व अधिकार्यांवर योग्य ती कारवाई करून सातपुडा वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे ….