येत्या रविवारपासून म्हणजे 28 जूनपासून सलून आणि जिम सुरु करण्यास परवानगी दिली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला

मुंबई : लॉकडाऊनमुळे बंद असलेला सलून व्यवसाय अखेर महाराष्ट्रात पुन्हा सुरु होणार आहे. राज्य सरकारने येत्या रविवारपासून म्हणजे 28 जूनपासून सलून आणि जिम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. जिम आणि सलून या आठवड्यात सुरु होईल,महाविकास आघाडी सरकारने याबाबतचा निर्णय घेतला. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनदरम्यान सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र अनलॉकिंगनंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले.
एकीकडे अन्य व्यवसायांना परवानगी दिली असताना, सलून व्यवसायाला परवानगी का नाही असा सवाल नाभिक समाज आणि सलून व्यावसायिकांनी विचारला होता. कोरोना काळातील लॉकडाऊन आणि अनलॉकिंगनंतर हळूहळू बहुतेक सेवा पूर्ववत होत आहेत. मात्र महाराष्ट्रातील सलून व्यवसाय अद्याप बंद आहेत. ही सेवा नियम-अटींसह सुरु करु द्यावी अशी मागणी सलून व्यावसायिकांकडून सातत्याने केली जात होती. त्यातच नाभिक समाज आणि सलून व्यावसायिकांनी हायकोर्टात याचिका दाखल करण्याची तयारी केली होती.पाच सलून व्यावसायिकांच्या आत्महत्या लॉकडाऊनमधील अर्थिक संकटामुळे राज्यभरात पाच सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत. याला राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप नाभिक समाजाचे सोमनाथ काशिद यांनी केला होता. महाराष्ट्रातील 10 लाख सलून व्यावसायिक आणि त्यांचे 40 लाख लोकसंख्या असलेल्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. दोन महिने झाले सतत अर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करीत आहोत. आजपर्यंत सरकारकडून कोणतीही अर्थिक मदत नाही. घरखर्च भागवणे, दुकान भाडे, लाईट बिल कसे भरणार असे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत, असं त्यांनी नमूद केलं.