चोपडा ग्रामीण पोलिसांचा कारवाईत 7 गावठी कट्ट्यांसह 10 जिवंत काडतुसे जप्त
चोपडा येथील ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत सात गावठी बनावटीच्या कट्ट्यांसह दहा जिवंत काडतुसे जप्त केली. आज शुक्रवारी (ता.२०) दुपारी साडेबाराच्या सुमारास तालुक्यातील हातेड-लासूर रस्त्यावर पाटाच्या चारीजवळ ही कारवाई करण्यात आली.


मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा ग्रामीण ठाण्यातील पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी राकेश पाटील, रावसाहेब पाटील, शशी पारधी, चेतन महाजन यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास हातेड-लासूर रस्त्यावर पाटाच्या चारीजवळ सापळा रचला.


यावेळी पार उमर्टी (मध्य प्रदेश)कडून मोटारसायकलवर येणाऱ्या मनोज राजेंद्र खांडेलकर (वय २४, रा. जुळेवाडी कराड, सातारा) व सागर सरणम रनसौरे (वय २४, रा.धायरी, पुणे) यांना थांबवून त्यांची चौकशी केली. त्यात त्यांच्याजवळ सात गावठी बनावटीचे कट्टे व दहा जिवंत काडतुसे मिळून आलीत. त्यानंतर दोघेही संशयितांना अटक करण्यात आली. वरील मुद्देमाल व त्यांच्या ताब्यातील एक मोटारसायकल, दोन मोबाईल, सातशे रुपये रोख असा एकूण दोन लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिस कर्मचारी राकेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही संशयितांविरुद्ध आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत.
