महाराष्ट्र 9

आषाढ मासारंभी पाऊस शब्दसरी काव्यमैफलीने चोपडयात कविकुलगुरु कालिदासांचे स्मरण..

[espro-slider id=13780]

आषाढ मासारंभी पाऊस शब्दसरी काव्यमैफलीने चोपडयात कविकुलगुरु कालिदासांचे स्मरण..

प्रतिनिधी ।चोपडा – महाकवी कालिदास यांच्या जयंतीनिमित्त ‘आषाढस्य प्रथम दिवसे…’ अर्थात आषाढ मासारंभानिमित्त चोपडा येथील गांधी चौकातील अमरचंद सभागृहात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष विलास पी. पाटील यांच्या संकल्पनेतून ‘पाऊस शब्दसरी’ या काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. नगर वाचन मंदिर, अखिल भारतीय साहित्य परिषद, शाखा – चोपडा व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा – चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मैफलीत पावसाचे विविध रंग कवींनी उलगडून दाखवले. काहींनी स्वरचित तर काहींनी संकलित कविता सादर करत श्रोत्यांची वाहवा मिळवली. बाहेर पाऊस पडत असतांना सभागृहातील रसिक श्रोते या शब्दसरींनी न्हासून निघाले.


        आरंभी मैफलीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कवी अशोक सोनवणे, नगर वाचन मंदिराचे उपाध्यक्ष प्रा. एस. टी. कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी, मसापचे कार्याध्यक्ष विलास पी. पाटील यांनी महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.


         ‘पाऊस शब्दसरी’ या मैफलीत सौ. अंजली देशमुख यांनी पावसाची दोन मराठी गीते सादर केली. प्रीती सरवैया, पंकज शिंदे, रेखा अशोक पाटील, वैद्य शैलेंद्रसिंह महाले, वैद्य सौ. प्राजक्ता महाले, शां. हि. पाटील,, संजय बारी ,प्रा.एस. टी. कुलकर्णी यांनी स्वरचित तसेच संकलित कवितांचे प्रभावी वाचन केले तर योगिता पाटील, तुषार लोहार, विलास पाटील यांनी गेय कविता सादर करुन श्रोत्यांचा प्रतिसाद मिळवला.
        कवी अशोक सोनवणे यांनी अध्यक्षीय समारोपात महाराष्ट्रातील विविध कवींनी पावसावर रचलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांचा धांडोळा घेत स्वरचित कविता सादर केली. पावसाच्या कवितांच्या या कार्यक्रमात श्रोते चिंब भिजले.


       निवेदक संजय बारी यांनी महाराष्ट्रातील नामवंत कवींच्या कवितांचा चपखल वापर करीत कवितांमधून चितारण्यात आलेल्या जीवनाच्या विविध भावरंगांचे चित्र मांडले तर श्रीकांत नेवे यांनी आभार प्रदर्शन केले. या मैफलीस डॉ. विकास हरताळकर, विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे, महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, साहित्यिक प्रदीप पाटील, सौ . सुनेत्रा कुलकर्णी, विलास सनेर यांच्यासह रसिक श्रोते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]