भडगाव येथील साई ऑटो सेंटर मधून 30 दुचाकी चोरणारा कर्मचारीच निघाला आरोपी..# गुन्हे शाखेने उघडकीस आणला गुन्हा
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क
जळगाव : भडगाव शहरातील चाळीसगाव रोडवरील साई ऑटो सेंटर (बजाज शोरुम) मधून कंपनीच्या तब्बल ३० दुचाकी चोरी गेल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल करीत चोरी झालेल्या तब्बल २६ दुचाकी जप्त केल्या आहेत.

शोरूममधील कर्मचारीच या गुन्ह्यात आरोपी निघाल्याने खळबळ उडाली आहे. शोएबखान रऊफ खान (नगरदेवळा, ता.पाचोरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. बजाज कंपनीच्या भडगावातील शोरूममधील ३० मोटारसायकल चोरीस गेल्या होत्या. त्यात १६ प्लॅटिना व १४ पल्सर गाड्यांचा समावेश होता. शोरुममधील स्टॉक रजिस्टर तपासल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकूण २३ लाख रुपये किंमतीच्या दुचाकी चोरी प्रकरणी भडगाव शहरातील चाळीसगाव रोडवरील साई ऑटो सेंटरचे संचालक रावसाहेब केशव पाटील (भडगाव) यांनी भडगाव पोलिसात तक्रार नोंदवली होती.

गुन्हे शाखेने उघडकीस आणला गुन्हा एक संशयित अल्प किंमतीत नव्या कोऱ्या दुचाकींची विक्री करीत असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांना मिळाल्यानंतर संशयित शोएबखान रऊफ खान (नगरदेवळा, ता.पाचोरा) यास ताब्यात घेण्यात आले. संशयिताला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच तीन महिन्यांपासून संधी मिळेल तेव्हा एक-एक दुचाकी लांबवल्याची आरोपीने कबुली दिली. आतापर्यंत पोलिसांनी ११ पल्सर व १५ प्लॅटीना अशा एकूण १९ लाख ५८ हजार १४९ रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत तर अन्य चार दुचाकींबाबत तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, उपनिरीक्षक गणेश वाघमारे, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, जयंत चौधरी, विजय पाटील, राहुल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर, मोतीलाल चौधरी, अनिल जाधव, नितीन बाविस्कर, श्रीकृष्ण देशमुख, हेमंत पाटील, राहुल बैसाणे, महेश पाटील आदींनी आरोपीला अटक केली.
