डिप्रेशन मुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम…मृत्यूचाही धोका वाढला.
ग.स. पतसंस्थेचे संचालक.. जगन्नाथ टि.बाविस्कर यांची स्पष्टोक्ती.

चोपडा (प्रतिनिधी)-
शासकीय, निमशासकीय, अंशकालीन कर्मचारी सध्याच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस डिप्रेशनमध्ये जात आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असून काहींना मृत्यूचाही धोका वाढलेला आहे, अशी स्पष्टोक्ती जळगाव ग.स.कर्मचारी पतसंस्था स्टाफ् सोसायटीचे संचालक जगन्नाथ टि.बाविस्कर (चोपडा) यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.
प्रत्येक कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग,अतिरिक्त कामाचा बोजा,कामकाजाची ऑनलाइन प्रक्रिया, परिपत्रकातील आदेशाची वेळीच अंमलबजावणी न होणे, वरिष्ठ अधिकारी व बाहेरील जनतेचा कामाबाबतचा तगादा,दबावतंत्र, गैरससोयीत बदली, यामुळे कर्मचारी ताणतणावांना तोंड देत असतात.अशातच त्यांना अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आयुष्यमान कमी होताना दिसत आहे. आपापसातील वाद-विवाद, भांडण-तंटे, द्वेषमत्सर,कळ लावालावी, वरिष्ठांच्या मर्जीत राहण्यासाठीची धडपड, आर्थिक देवाण-घेवाण, व्यसनाधीनता यामुळे कर्मचारी डिप्रेशनमध्ये जात असतो.पर्यायाने नैराश्यांमुळे मानसिकआजार, हृदयविकार, मेंदूविकार, उच्च व कमी रक्तदाब, कर्करोग, मधुमेह, स्मृतिभ्रंश, अर्धांगवायूचा झटका, किडनीचे आजार अशा लहान-मोठ्या आजारांचा धोका संभवतो. अशातच काहींचा अपघात होतो, तर काहीजण आत्महत्या करतात. यासाठी कर्मचाऱ्यांना अभय देऊन योग्य वेळी आरोग्याबाबत समुपदेशन करणे गरजेचे आहे. कारण कर्मचारी आपल्या कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे मानसिक, शारीरिक आजारांकडे गांभीर्याने बघत नाहीत. यामुळे दिवसागणिक बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी मृत्युमुखी पडत आहेत.
म्हणून प्रत्येक कार्यालयातील वरिष्ठअधिकारी, कर्मचारी संघटना व संस्था यांनी आपल्या अखत्यारीतील कर्मचाऱ्यांची मानसिक, बौद्धिक, शारीरिक आरोग्य तपासणीसाठी मोहीम राबविली पाहिजे, असेही भावनिक आवाहन..जगन्नाथ टि.बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी केले आहे.