नागलवाडी ग्रामपंचायत अपहाराची अधिकाऱ्यांकडून लपवालपवी …. माहितीच्या अधिकारात बाब उघड…नईमोद्दीन ऐनोद्दीन शेख आर टीआय कार्यकर्ता यांची कारवाईची मागणी..
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :–
चोपडा तालुक्यातील नालगवाडी ग्रामपंचायत येथे झालेला ग्रामनिधी व पाणी पुरवठा निधी तसेच १४ वा वित्त आयोगा अंतर्गत निधीचा अपहार झाल्याची तोंडी चर्चा सर्वत्र होती त्यासाठी नईमोद्दिन शेख यांनी माहिती अधिकारात सदर प्रकरणाची माहिती मागितली असता त्यात संबंधीत माहिती अधिकारी तथा ग्रामसेवक नागलवाडी यांनी त्यासंबंधी माहिती पुरवली आहे. त्यात तत्कालीन ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे व सरपंच प्रताप शेनपडू भिल यांनी संगनमताने व ग्रामपंचायत कमेटीच्या सर्व सदस्यांच्या संमतीने १४ व्या वित्त आयोग निधीच्या खात्यातून दि.०१/०२/२०२२ ते ०४/०४/ २०२२ या कालावधीत २४,५६,३००/- रु. एवढी रक्कम ही काढून अपहार केल्याचे दिसते.

या संदर्भात गट विकास अधिकारी भरत कोसोदे यांनी नागलवाडी ग्रामपंचायतील झालेल्या अपहार व भ्रष्ट्राचार संदर्भात चौकशी अहवाल माहिती अधिकारात पुरविलेला आहे. त्यानुसार नागलवाडी ग्रामपंचायतीत ग्रामनिधी व पाणीपुरवठा निधी तसेच १४ वा वित्त आयोग निधी या खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कमा काढलेल्या दिसून येत आहेत .गट विकास अधिकारी भरत कोसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विभाग विस्तार अधिकारी एस. टी. मोरे यांनी चौकशी केलेली आहे. त्यानुसार प्रथमदर्शनी २४,५६,३०० रूपये भ्रष्ट्राचार व अपहार झाल्याचे सिध्द झालेले आहे.

असे असतांना गट विकास अधिकारी भरत कोसोदे व विस्तार अधिकारी एस.टी.मोरे यांनी सदर अपहार व भ्रष्ट्राचार दडपण्यासाठी मुळ दस्तऐवजामध्ये खोटे व बनावट कागदपत्रांचा समावेश करणेकामी मदत केलेली दिसून येत असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे.
गट विकास अधिकारी भरत कोसोदे व विस्तार अधिकारी एस.टी.मोरे यांच्या चौकशी अहवालानुसार तत्कालीन ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे, विद्यमान सरपंच ग्रा.पं. नागलवाडी यांनी १४ व्या वित्त आयोग निधीतुन दि.०१/०२/२०२२ ते ०४/०४/२०२२ या कालावधीत काशिनाथ वामन कोळी, हेमराज सी. कोळी, सुनिता हेमचंद्र सोनवणे, युवराज नारायण बाविस्कर, विनोद मोतीराम पाटील, नरेंद्र सखाराम पाटील यांच्या नांवे रक्कमा काढलेल्या दिसतात, वास्तविक गावात कुठल्याही प्रकारचे बांधकामे किंवा विकास कामे सुरु नसतांना सदर रक्कमा हया वरील नमुद व्यक्तींच्या नांवे काढून स्वतः वापर केलेला आहे हे प्रथमदर्शी बँकेच्या स्टेटमेंट वरुन दिसून येते. असे असतांना देखील गट विकास अधिकारी भरत कोसोदे व विस्तार अधिकारी एस. टी. मोरे यांनी सदर प्रकरण दडपण्यासाठी सदर रक्कमा हया कामापोटी ठेकेदारांना अग्रीम देण्यात आलेल्या आहेत असे अहवालात नमुद करुन घेतलेले आहे. सदर रक्कमा हया ०१/०२/२०२२ ते ०४/०४/ २०२२ या कालावधीत अग्रीम देण्यात आल्याचे दाखविले आहे. परंतु सदर कामांना तांत्रीक मान्यता ही २१/०३/२०२२ रोजी घेण्यात आलेली आहे. असे चौकशी अहवालात नमुद करण्यात आलेले आहे. तसेच माहिती अधिकारात देण्यात आलेल्या तांत्रीक मान्यतेत देखील २१/०३/२०२२ ही तारीख नमुद आहे. यावरुन असे सिध्द होते की, सदर रक्कमा हया ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतःच्या फायदयासाठी वापरल्याचे प्रथमदर्शनी दिसते.

ग्रामपंचायत नियम व शासकीय बांधकाम नियमा नुसार कोणतेही काम सुरु करण्या अगोदर प्रशासकीय मान्यता घेणे त्यानंतर तांत्रीक मान्यता घेणे व त्यानुसार टेंडर किंवा ई-टेंडर प्रक्रिया करणे व ३ लाखाच्या आतील काम असल्यास वर्तमानपत्रात जाहिरात देवून निविदा मागविणे व सदर निविदा नियमानुसार मंजुर करणे व त्यानंतर मंजुर निविदे नुसार संबंधीत ठेकेदारांचे सुरक्षा अनामत स्विकारणे व तदनंतर वर्क ऑर्डर देणे या सर्व बाबी क्रमप्राप्त असुन देखील सर्व कारभार बेकायदेशीरपणे करुन बँकेतून रक्कम काढलेल्या दिसून येतात हे सर्व माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रावरून स्पष्टपणे दिसून येत असल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे.
गट विकास अधिकारी भरत कोसोदे व विस्तार अधिकारी मोरे हे दोघे देखील नागलवाडी येथील भ्रष्ट्र व अपहारात सहकार्य केल्याचे त्यांच्या अहवालवरुन दिसून येते .त्यामुळे त्यांच्या विरुध्द नियमानुसार शिस्तभंग विषयक कार्यवाही करुन दोघांना ताबडतोब निलंबीत करण्यात यावे अशी मागणी तक्रारदार नईमोद्दीन ऐनोद्दीन शेख आर टीआय कार्यकर्ता यांनी केली आहे….
