आई-वडील आणि गुरुंच्या आशीर्वादानेच यशस्वी जीवनाचा पाया
आरोग्य दूत डाॅ. विकासकाका हरताळकर यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क
मित्र जोडताना आपल्या अभ्यासकाळातील बालपणीचे मित्र हेच आपल्या कामात येत असतात. क्षणिक मित्र हे आपल्या कोणत्याही कामाचे नसतात याचे ध्यान ठेवून मैत्री करावी. आपल्या व्यावसायिक जीवनात यशस्वी होत असताना आई-वडिलांचे व गुरुजनांचे आशीर्वाद तसेच मार्गदर्शनदेखील महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आपण आपल्या जीवनाचा पाया त्यानुसार रचल्यास यशस्वी इमारत उभी राहिल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन आरोग्यदूत डाॅ. विकासकाका हरताळकर यांनी केले. चोपडा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित ‘नीट’ परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

ज्येष्ठ नागरिक संघाच्या भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. हरताळकर यांनी आपल्या जीवनपटलावर आपण यशस्वीरित्या कसे घडलो व कशी वाटचाल केली याविषयी सविस्तर माहिती दिली. आपल्या काळातील डॉक्टर्स मंडळींना यशाची व्याख्या फार मोठ्या प्रमाणात यशस्वी करता आली. संघर्ष हा जीवनाचा पाया आहे हे ध्यानी ठेवून जर प्रत्येकाने वाटचाल केली तर तो हमखास यशस्वी होतो, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची सुरुवात ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेने झाली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारत माता प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक व नगरपरिषदेचे आरोग्यदूत डॉ. विकासकाका हरताळकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नरेंद्र शिरसाट (अध्यक्ष, आयएमए, चोपडा), नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. हेमंत निकम उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस सचिव श्री. प्रमोद डोंगरे यांनी संस्थेविषयी माहिती दिली. तर संस्थाध्यक्ष श्री. विजय करोडपती यांनी कार्यक्रम उद्देश व पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांतर्फे कु. लिना अहिरे व कु. अनुष्का सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले. एसडीबी मार्गदर्शन अभ्यासिकेतर्फे प्रा. रमेश वाघजाळे यांनी मनोगत व्यक्त केले. तर सूत्रसंचालन प्रा. सौ. आशा वाघजाळे यांनी केले.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांपैकी सर्वश्री प्रा. श्री. श्यामभाई गुजराथी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना भविष्यात आपण यशस्वी डॉक्टर व्हावे व आपल्या चोपडा गावासह सर्वांची सेवा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. एसडीबी ग्रुपतर्फे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक ज्येष्ठ नागरिक संघाने का करावे याबद्दल मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, कोणत्याही शुभकार्यास ज्येष्ठांचे आशीर्वाद व मार्गदर्शन जीवनात आवश्यक असल्याने समाज व समाज जीवन नेहमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. परंतु, समाजाने केलेले मार्गदर्शन आपण कितपत अंमलात आणतो हादेखील यक्षप्रश्न असल्याने भावी काळात ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या भविष्यातील या डॉक्टर्स मंडळींनी चोपड्याची अधिकाधिक प्रमाणात सेवा करावी हाच उद्देश ठेवून ज्येष्ठ नागरिक संघाने सदरचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले.
*चांगले आचरण असावे*
नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख मार्गदर्शक डॉ. नरेंद्र शिरसाट यांनी भावी डॉक्टर होणाऱ्या या विद्यार्थी डॉक्टरांनी कशा पद्धतीने आचरण करावे. शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या विद्यार्थी जीवनात आपण कसे घडलो याचे सुरुवातीपासून त्यांनी मार्मिक असे विवेचनही केले.

*अपयशातून यशाकडे वाटचाल करा*
मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी समाजात काम करत असताना आपण जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य केले पाहिजे. जबाबदारीची भान असणाऱ्यांना समाज नेहमी डोक्यावर घेत असतो यशाने हुरळून जाऊ नये, असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी अपयशाने निराश होऊ नये असा सल्लाही त्यांनी याप्रसंगी दिला. आपल्या विद्यार्थी जीवनात आपण अपयशातून यशस्वी घडलो असे सांगून त्यांनी या वेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी अपयशाचा मूलमंत्र ध्यानी ठेवून यशस्वी वाटचाल करावी, असे सांगितले.
*ज्येष्ठ नागरिक संघाचे कौतुक*
याप्रसंगी सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ज्येष्ठ नागरिक संघाच्या या उपक्रमाचे कौतुक करीत ज्येष्ठ नागरिक संघाचे सुयश चिंतिले. समाजाचे आपण देणे लागतो हे भान ठेवून चोपडा ज्येष्ठ नागरिक संघ नेहमीच वाटचाल करीत आला आहे व त्यानुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन नियमित केले जाते हे कौतुकास्पद असल्याचे याप्रसंगी सर्वच वक्त्यांनी आपल्या मनोगतातून आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय करोडपती, सचिव प्रमोद डोंगरे, मधुकर बाविस्कर, जयदेव देशमुख, एन. डी. महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
या मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक संघाचे बांधकाम समिती उपाध्यक्ष श्री रमणलाल गुजराथी, कार्यकारिणी सदस्य श्री. मधुकर बाविस्कर, जयदेवनाना देशमुख, ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालीवाल आदी मान्यवरांसह विद्यार्थ्यांचे पालक, माता, भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवपत्र, गौरवचिन्ह, गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीने डॉ. पराग पाटील, श्री संतोष अहिरे व इतरांनी मनोगत व्यक्त केले. सचिव प्रमोद डोंगरे यांनी आभार मानले. सहसचिव एन. डी. महाजन यांनी पसायदान म्हणत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
