महाराष्ट्र 9

सरकारी योजनांची भीक नको तर शेतमाल हमीभावाचा हक्क हवा

[espro-slider id=13780]

सरकारी योजनांची भीक नको तर शेतमाल हमीभावाचा हक्क हवा


म. गां. शि.मंडळ संचालित कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाकडून चुंचाळे गावातील शेतकऱ्यांचे नुकतेच आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण करण्यात आले. कबचौ उमवी जळगाव च्या अर्थशास्त्र विषयात SYBA व MA च्या विद्यार्थ्यांना कृषी अर्थशास्त्र हा विषय अभ्यासक्रमासाठी आहे. समाजाशी विषयाशी असणारी बांधिलकी व ग्रामीण भागातील शेतकरी वर्गांची परिस्थिती विद्यार्थ्यांना समजावी हा या सर्वेक्षणामागचा प्रमुख उद्देश असल्याचे अर्थशास्त्र विभागप्रमुख व सर्वेक्षणाचे समन्वयक प्रा.विशाल हौसे यांनी सांगितले. सर्वेक्षणासाठी शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती समजेल अशी 30 प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली होती. सर्वेक्षणात सहभागी विद्यार्थ्यांचे 6 गट तयार करण्यात आले होते ,प्रत्येक गटात 4 विद्यार्थ्यांचा सहभाग होता .साधारणपणे 60 शेतकऱ्यांची मुलाखत घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला . सदर सर्वेक्षणात असे दिसून आले कि बहुतांशी शेतकऱ्यांकडे असणारी शेती ही वडिलोपार्जित शेती आहे.चुंचाळे येथील शेतकरी जिरायती व बागायती अशा दोन्ही प्रकारची शेती करताना दिसून आले.काही प्रयोगशील शेतकरी वगळता बहुतांशी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करताना दिसून आले. शेतकऱ्यांना अनेक समस्या भेडसावतात महत्वाची समस्या म्हणजे शेतीतील उत्पादन हे स्थिर स्वरूपाचे नाही.निसर्गाच्या लहरीपणाचा व सरकारी धोरणाचा शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.समाधानाची बाब म्हणजे जलसिंचनाच्या साधनांचा वापर दिसून आला. एकूण शेतकाऱ्यांपैकी 10% शेतकरी हे प्रयोगशील शेतकरी दिसून आले ,हे शेतकरी कृषी विषयक वेगवेगळ्या परिसंवादामध्ये उपस्थिती देतात,कार्यशाळेमध्ये सहभागी होतात,प्रश्न विचारतात ,प्रशिक्षण घेतात,अभ्यास करून नवनवीन पिकाची लागवड करतात त्यात प्रामुख्याने हळद,सुबाभूळ,निलगिरी,डाळिंब,पेरू,निंबु इ.पिके दिसून आली.80% शेतकरी पीक विमा काढतत्व त्यांना पीक विम्याचा लाभ हि मिळाला आहे.75% शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. कृषी मालाची विक्री शेतकरी खाजगी व्यापारी,चोपडा बाजारपेठ,नाशिक बाजारपेठेत केली जाते परंतु शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही असा नाराजीचा सूर दिसून आला .चुचाळे येथील प्रगतिशील शेतकरी श्री.किरण सदाशिव शिंपी यांनी सांगीतले की ,”शेतकऱ्यांना सरकारी योजनांची भीक नको,तर शेतकऱ्याच्या कष्टाच्या मालाला हक्काचा हमीभाव मिळाला पाहिजे ” . सामाजीक स्थिती विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास श्री.संजूभाऊ पाटील या सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी यांनी सांगितले की,” पूर्ण समाजाची अन्नाची गरज भागविणारा बळीराजा हा फक्त नावाचा राजा राहिला आहे ,समाजात वावरत असताना शेतकऱ्यांचं स्थान हे खूपच दुय्यम दर्जाचं आहे अशी अनुभिती सातत्याने होत राहते” शेतकऱ्यांच्या मुलाचे लग्न जुळविण्यात समाजात काही अडचण निर्माण होते का असे विचारल्यास श्री.चौधरी या ग्रामस्थांनी सांगितले की ,”खूपच समस्यांना सामोरे जावे लागते बऱ्याच पाहुणे मंडळींना शेती हवी आहे परंतु मुलगा शेतकरी नको.” येथील शेतकरी फक्त बँकेकडूनच कर्ज घेतात कोणत्याही खाजगी सावकाराकडून कर्ज घेत नाहीत.घेतलेल्या कर्जाचा वापर फक्त शेती कामासाठीच करतात सण,विवाह, उत्सवासाठी त्याचा वापर करत नाहीत.कर्जाची परतफेड वार्षिक करतात. शेतकऱ्याचे वेगवेगळ्या बँकेत खाते आहेत शिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड चा वापर पण बहुतांशी शेतकरी करतात हि समाधानकारक बाब दिसून आली . सरकारकडून काही विशेष अशा अपेक्षा आहेत का असे विचारल्यास श्री.शिंपी म्हणाले की ,”सरकार कोणाचे हि असो शेतकाऱ्यांच्या दुःखा कडे कोणाचेही लक्ष जात नाही अशा लोकांकडून काय अपेक्षा करायच्या सरकारी धोरणाचा अजिबातच काही उपयोग होत नाही असं नाही मात्र त्याची परिणामकारकता पाहिजे तेवढी जाणवत नाही “. तुम्ही सर्व शेतकरी म्हणून शेतकी व्यवसायात समाधानी आहात का असे विचारल्यास ,”हो!आम्ही समाधानी आहोत ,कारण या शेती शिवाय दुसरा कोणताही पर्याय आमच्याकडे नाही असे उपहासात्मक उत्तर मिळाले ” कमीत कमी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आमची आर्थिक व सामाजिक स्थिती कशी आहे हे जाणून घ्यावेसे वाटले हे आम्हा शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब आहे अशी भावना व्यक्त करताना अर्थशास्त्र विभागाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.सदर सर्वेक्षणात कु.आशा शिंदे,कु.भारती साळुंखे,कु.पूनम पाटील,कु.बिरारे निकिता,कु.माळी दीपाली,पाटील वैशाली,कु.पावरा रेखा,कु.योजना दीक्षित,कु.प्रज्ञा शिरसाठ,कु.प्रगती मराठे,कु.भावना पाटील,कु.अश्विनी पाटील,तेजस्विनी चौधरी,कु.योगिता पाटील,कु.करिश्मा पाटील,राहुल कविरे,प्रमोद पवार,वनवाश्या पावरा,कु.मामिता पावरा,कु.गायत्री जाधव इ. विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विशाल पांडुरंग हौसे यांनी सदर सर्वेक्षणासाठी मार्गदर्शक व समन्वयक म्हणून काम पाहिले तर विभागातील श्री.दीपक पाटील,सौ.पूजा पुन्नासे,श्री गोपाळ पाटील यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]