‘जगण्याचे भान आणि अनुभवाची समृद्धी साहित्यातून येते’

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातर्फे ‘वाड:मय मंडळ उदघाटन समारंभाचे’ आयोजन करण्यात आले. मा.कै.ना.सौ.आक्कासो.शरश्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात संगीत विभाग प्रमुख श्री. किशोर खंडागळे व विद्यार्थी यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. याप्रसंगी उदघाटक व प्रमुख पाहुणे मा.डॉ.आशुतोष पाटील (अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ, क.ब.चौ.उमवि, जळगाव), कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, सौ.एम.टी.शिंदे, श्री.ए.बी.सूर्यवंशी (प्रमुख, वाड:मय मंडळ) आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री.डी.एस.पाटील यांनी करून दिला.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे मा.डॉ.आशुतोष पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले की, मराठी भाषेच्या संवर्धनाविषयी आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे तसेच भाषेच्या विद्यार्थ्यांनी विषयाची निवड करतांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. विद्यार्थ्यांनी नेहमी आपल्यामधील वेगळेपणा व कौशल्य, क्षमता, स्वतःची ओळख, पात्रता या गोष्टी ओळखून व्यक्तिमत्व विकास साधला पाहिजे. आपण घेत असलेल्या शिक्षणातून मनातील न्यूनगंड दूर होऊन आत्मविश्वास जागा व्हायला हवा. मराठी भाषा संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या बोलीत बोलले पाहिजे, त्यांच्या या भाषेविषयी कोणतीही न्युनतेची भावना मनात ठेवू नये. मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी वाचक, मराठी भाषिक व बोली भाषिक यांची आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. विद्यार्थ्याने आपला विकास करण्यासाठी स्वतःला सिद्ध करायला हवे, विषयाचे सूक्ष्म,सखोल अध्ययन, संदर्भ ग्रंथाचे वाचन, मराठी साहित्याचा सर्वांगीण अभ्यास व विषयाचे अद्ययावत ज्ञान संपादन करायला हवे. साहित्य वाचनातून विनयशीलता, आत्मविश्वास, अनुभवाची समृद्धी, सामंजस्यपणा या गोष्टी विकसित होतात. मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील घडामोडींचा बारकाईने अभ्यास व निरीक्षण करून त्या गोष्टी अनुभवातून साहित्य लेखनात मांडायला हव्यात. आजच्या धावपळीच्या युगात आजूबाजूच्या घडामोडी आपल्याला प्रभावित करतात त्यामुळे आपण आपल्यातील कौशल्य व क्षमता ओळखायला विसरतो म्हणूनच विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःला ओळखल्याशिवाय विकास होणार नाही. तडजोड, दुसऱ्याच्या भावनांचा आदर, समंजसपणा या सर्वांमधून आपल्यातील कौशल्य विकास साध्य होईल, अशाप्रकारचा विकास करण्यासाठी साहित्याचे वाचन करायला हवे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी जिद्द व आपल्यातील क्षमता ओळखून तशी कृती करणे गरजेचे आहे. कोणत्याही विषयाचे अध्ययन करतांना आपला उत्साह टिकवून ठेवायला हवा तरच आपले अस्तित्व सिद्ध करता येईल. आजच्या विद्यार्थ्याने जगण्याचे भान व जाण ठेवायले हवे. वेळेचा सदुपयोग करणे, आवडीच्या विषयाचे सूक्ष्म वाचन करणे गरजेचे आहे त्यातूनच विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित होण्यास मदत होईल.
या कार्यक्रमाचे आभार सौ.व्ही.जी.सोनवणे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.एम.एल.भुसारे यांनी केले. या कार्यक्रमासाठी श्री.डी.पी.सपकाळे, श्री.एस.बी.पाटील, डॉ.आर.आर.पाटील, सौ.एस.बी.पाटील,श्री भूषण पवार, श्री.जी.बी.बडगुजर, कु.के.एस.राजपूत, कु.पी.डी.पाटील, कु.एस.जे.पठाण मॅडम यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी मराठी, हिंदी व इंग्रजी विभागातील विद्यार्थी, शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.





