आधुनिक युगात योग व प्राणायमाला महत्त्वाचे स्थान : ॲड. संदीप पाटील
चोपडा प्रतिनिधी :–

चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने एक आठवड्याची ऑनलाइन राष्ट्रीय योग कार्यशाळेचा समारोप व आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले की, योग व प्राणायमाचे महत्व आजच्या आधुनिक युगात दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. प्रत्येक व्यक्ती दिवसातील काही क्षण आपल्या सुदृढ आरोग्यासाठी खर्च करण्यासाठी आज प्रेरित झालेला आहे.

कोरोनाच्या काळात खऱ्या अर्थाने व्यायाम, योग व प्राणायम यांच्या माध्यमातून अनेकांनी कोरोना वर मात केलेली आहे. प्रत्येकाने दिवसातील थोडा वेळ स्वतःच्या शरीरासाठी योग व प्राणायमाच्या माध्यमातून द्यावा, असे आवाहन देखील त्यांनी केले. योग दिन निमित्ताने औरंगाबाद येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. कोटे हे प्रमुख अतिथी व योग प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनी मानवी सुदृढ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असे प्राणायमाचे व योगांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच त्यांचे महत्त्व व फायदे देखील विशद केले.

