अडावद येथील शिक्षकाची कोरोनाशी झुंज अयशस्वी
एका महिन्याच्या उपचारानंतर भिवंडी येथे निधन
अडावद ता २७ (सकाळ वृतसेवा ) (रोहिदास मोरे )
अडावद ता. चोपडा येथील मुळ रहिवासी व ह. मु. कुडुस ता. वाडा जि. पालघर व भिवंडी तालुक्यातील खारबाव आश्रमशाळेतील ४० वर्षीय शिक्षकाचा एका महिन्याच्या उपचारानंतर भिवंडी येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना काल सकाळी त्याचे कोरोनाने निधन झाले आहे .

खारबाव येथील आश्रम शाळेतील विद्यार्थीप्रिय व पालकांशी सातत्याने संपर्कात असणारे शिक्षक सुधीर गोपीचंद बाविस्कर (वय – ४0 वर्षे ) मुळगाव अडावद ता चोपडा ह मु कुडुस ता वाडा यांना गेल्या महिन्यात खावटीचा सर्वेक्षणाचे काम असल्याने त्यांनी गावात जाऊन घरोघरी सर्वेक्षण केले व त्यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांना लागलीच भिवंडी येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . हॉस्पिटलमध्ये आठ दिवस उपचार घेतल्यानंतर ते घरी आले नंतर घरात वडील , पत्नी व दोन्ही मुलेही पॉझिटिव्ह झाले . त्यांना ही खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . त्यांची तब्बेत बरी होऊन ते घरी आले नंतर आठ –दहा दिवसानंतर सुधीर बाविस्कर यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने पुन्हा त्यांना भिवंडी येथे त्याच खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले . २८ दिवसापर्यत त्यांच्या प्रकुतीत सुधारणा झाली नाही . दि २६ रोजी सकाळी दोन वाजता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला .

गावात व शाळेत मनमिळाऊ व विद्यार्था प्रिय शिक्षक म्हणून ते परिचीत होते . घरात ते एकुलते एक कमावणारे होते .त्यांच्या पश्चात वडील , पत्नी व दोन मुले आहेत ..
घरातील कमावणारी व्यक्ती गेली असल्याने शासनाने त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी व पत्नीला नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी नातेवाईक व परिवाराने केली आहे.
