महावीर पतपेढीत अपहार प्रकरणी आज मुख्य आरोपी मॅनेजर शोभा सांखला यांना अटक ;लाखो रुपयांचा अपहार# सात महिन्या नंतर तिन्ही आरोपीना अटकेत # तिन्ही आरोपींना तीन दिवसाची कोठडी


प्रतिनिधी | चोपडा
महावीर पतपेढीत कर्जदाराची रक्कम कर्ज खात्यात न भरता परस्पर केला 1 लाख 8 हजार 342 रूपयाचा अपहार प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दि 23 सप्टेंबर 2020 रोजी नरेंद्र जैन व प्रवीण जैन ,माजी व्यवस्थापक शोभा सांखला(48) यांचा विरुध्द व्यवस्थापक अचल अग्रवाल यांनी गुन्हा दाखल केला होता. या दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी नरेंद्र चंपालाल जैन (53 ) व पिग्मी एजंट व लिपिक प्रविण इंदरचंद जैन (45)(दोन्ही रा.गणेश कॉलनी, चोपडा) हे दि 10 रोजी शहर पोलिसात स्वतःहुन हजर झाले असता त्यांना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की,शहरातील महावीर पतपेढी अंतर्गत असणाऱ्या बाजारपेठ शाखेचे शाखा व्यवस्थापक नरेंद्र चंपालाल जैन यांनी पतपेढीत काहीतरी रकमेचा अपहार केलेला आहे असे निर्देशनात समजून आल्यानंतर व्यवस्थापक अचल अग्रवाल यांनी शाखा कार्यालयात जाऊन संबंधित कर्जदारांचे व त्यांनी परतफेड केल्याबाबत पाहणी केली असता कर्ज खतावणीत 75 हजार 932 रुपये कर्जदाराने भरणा केलेला असून बाकी रक्कम 1 लाख 8 हजार 342 रुपये कर्जदाराने कर्ज भरण्याबाबत विचारणा केली असता सदर कर्जाची संपूर्ण रक्कम मुख्य शाखेतील त्यावेळचे पिग्मी एजंट व लिपिक प्रविण इंदरचंद जैन यांच्याकडे केलेली आहे असे त्यांनी सांगितले.

सदर कर्ज प्रकरणाची सखोल पाहणी केली असता बाजारपेठ शाखेचे शाखा व्यवस्थापक नरेंद्र जैन यांनी पतपेढीच्या लेटरपॅडवर दिनांक ४ ऑगस्ट २०११ रोजी सही शिक्या सह पत्र देऊन कर्जदार नजर गहाण कर्जाची रक्कम पूर्ण परतफेड केली असल्याने त्यांच्या गट नंबर १०२ वरील बोजा कमी करण्यास विनंती आहे. असे लेखी पत्र दुयम निबंधक चोपडा यांना दिलेले आहे.

त्या अनुषंगाने सदर मिळकतीचा सातबारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा कमी झालेला आहे. व यातील कर्जदारांने १ लाख ८ हजार ३४२ बोजा कमी करण्याच्या आधी प्रवीण जैन यांच्याकडे पैसे दिले आहेत, तरी प्रवीण जैन यांनी दिलेली रक्कम कर्ज खात्यात जमा न करता महावीर सहकारी पतपेढी मर्यादित चोपडा बाजारपेठ शाखेचे व्यवस्थापंक नरेंद्र जैन व प्रविण जैन यांनी स्वतःच्या फायद्यासाठी स्वतः जवळ रक्कम ठेऊन अपहार केला आहे म्हणून अचल अग्रवाल याच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात नरेंद्र चंपालाल जैन व प्रवीण इंदरचंद जैन (दोघे रा चोपडा) याच्या विरुद्ध १लाख ८हजार ३४२ रकमेचा अपहार केल्या प्रकरणी
गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याविरुद्ध नरेंद्र जैन व प्रवीण जैन, यांचा उच्च न्यायालयात जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने ते दि १०रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर झाले आणि मुख्य आरोपी शोभा सांखला ह्या दी.११ रोजी स्वतः हजार झाल्या असून त्यांना शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली आज तिन्ही आरोपींना चोपडा न्यायलयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.पुढील तपास सपोनि अजित साबळे करत आहेत.
