चोपडा तालुक्यातील लासुर ग्रामपंचायतीच्या चौकशी अहवालास विस्तार अधिकाऱ्यांकडून विलंब का?
तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य भिकन माळी यांचा सवाल?..
लासूर ता.चोपडा(प्रतिनिधी)-लासुर येथील ग्रामपंचायतने सन २०२३ ते २०२४ या कालावधीत १४ वित्त आयोगाच्या जीएम पोर्टल द्वारे खरेदी केलेल्या ७ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीच्या वस्तू खरेदी केल्या.मात्र यात तफावत असल्याचे ग्रामपंचायत सदस्य भिकन पितांबर माळी यांनी गटविकास अधिकारी चोपडा यांच्याकडे दिनांक २०/८/२४ रोजी लेखी तक्रार केली होती.

त्या अर्जाची उशिरा का होईना पंचायत समितीतील ग्रामपंचायत विभागाने दखल घेत दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी पंचायत समितीतील ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी रामचंद्र सैंदाणे यांच्या मार्फत चौकशी केली होती. चौकशीत त्यांनी लासूर ग्रामपंचायतीला भेट देत तक्रारदार यांच्या अर्जात उल्लेखेतलेली तक्रार अर्ज प्रमाणे चौकशी करून ग्रामपंचायतने विकत घेतलेल्या वस्तूंची शहानिशा केली होती.यावेळी खरेदी केलेल्या वस्तू यांच्या कंपनी व वास्तवात असलेल्या वस्तू यांच्या कंपनीत फरक आढळून आला होता असे तक्रारदार यांनी सांगितले होते.

तर याचा चौकशी अहवाल विस्तार अधिकारी रामचंद्र सैंदाणे हे वरिष्ठांना पाठवणार होते.मात्र जवळपास तीन आठवडेचा कालावधी पूर्ण होऊनही श्री सैंदाणे यांनी अद्याप पावतो वरिष्ठांकडे चौकशी अहवाल पाठवला नसून त्यामुळे कारवाईस दिरंगाई होत आहे. श्री सैंदाणे यांनी चौकशी अहवाल पाठवण्यासाठी दिरंगाई करणे यात ग्रामसेवक व सरपंच यांना क्लीन चीट मिळण्यासाठी तर प्रयत्न होत नाही ना अशी शंका तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य भिकन माळी यांनी व्यक्त केली आहे. लासुर ग्रामपंचायतचे सरपंच व विस्तार अधिकारी श्री सैंदाणे हे एकाच समाजाचे असून ही चौकशी खरंच पारदर्शकपणे झाली आहे का? असा सवालही त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.

याबाबत तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य भिकन पितांबर माळी यांचे म्हणणे असे आहे की,ग्रामपंचायतने १४ वित्त आयोगाच्या जीएम पोर्टल द्वारे ७ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीच्या वस्तूंची खरेदी केली.या वस्तूंचे ३४०९३ या चेक द्वारे २९/१२/२३ रोजी पेमेंट देखील अदा करण्यात आले आहे. मात्र यातील काही वस्तू निदर्शनास येत नसून मी ग्रामपंचायत सदस्य असल्याने मासिक मीटिंगमध्ये सदर विषयाची चर्चा केली.त्यावर मला ग्राम विकास अधिकारी यांनी उडवा उडवी चे उत्तरे देत वेळ मारून नेली.असे तक्रारी अर्जात नमूद करण्यात आले आहे.
सदर चौकशीनंतर तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य भिकन माळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,काही वस्तू या आताच आणून ठेवण्यात आले आहेत. स्टॉक रजिस्टर मध्ये याची नोंद नाही.बिलामध्ये कंपनी वेगळी तर आणून ठेवलेल्या वस्तूंची कंपनी वेगळी अशी तफावत आहे. त्यामुळे यात घोटाळा झाला असल्याचे भिकन माळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.





