
जळगाव:शहर महापालिका क्षेत्र, भुसावळ, पाचोरा, अमळनेर, अडावद, चोपडा आणि कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणच्या मद्यविक्री दुकानांमधून घरपोच मद्य विक्री करण्याला जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी परवानगी दिली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ही मद्य विक्री करता येणार आहे. दरम्यान ग्राहकांना घरपोच मद्य उपलब्ध करून देताना डिलीवरी बॉयसाठी आवश्यक त्या सूचना व अटी घालून देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिका-यांनी जारी केलेल्या आदेशानुसार विदेशी मद्य, सौम्य मद्य, वाईन आणि बीयर आदींची ऑनलाईन ऑर्डर घेऊन घरपोच विक्री करता येणार आहे. तथापि, यातून देशी दारूला मात्र वगळण्यात आले आहे.
ज्यांच्याकडे मद्याचा परवाना आहे त्यांनाच या प्रकारातील सेवा पुरविण्यात यावी असे निर्देश यात देण्यात आलेले आहेत. मद्यासाठीचा परवाना महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तर दुकानदार हा दूरध्वनी, भ्रमणध्वनी, व्हाट्सएप, एसएमएस आदींच्या माध्यमातून ऑर्डर स्वीकारू शकणार आहे. सध्या लॉकडाऊन सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांनी विहीत केलेल्या वेळेतच ग्राहकांना त्यांची ऑर्डर घरपोच पोहचवता येणार आहे. तर डिलीव्हर बॉयने लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देखील यात देण्यात आलेले आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ग्राहकाला संबंधीत मद्याच्या छापील मूल्यात म्हणजेच एमआरपीमध्येच विक्री करावी लागणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.