
जळगाव: कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढता आकडा पाहता प्रशासन आणखी सतर्क झालंय. गेल्या २४ तासात जळगावात ६ कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडलीय. या रुग्णांमध्ये चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. यापैकी दोन रुग्णांचा तपासणीसाठी दाखल होण्याअगोदर तर दोघांचा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मृत्यू झालाय. पाचोरा येथील पुरूष रूग्णाचा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झालेला आहे. तर अमळनेर येथील कोरोना बाधित महिलेचा काल मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्हा रुग्णालयात कोरोना सदृष्य लक्षणे असल्याने दाखल झालेल्या रुग्णांपैकी स्वॅब घेण्यात आलेल्या ५२ रुग्णांचे तपासणी अहवाल सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले. यामध्ये ४ रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, उर्वरित ४८ रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
अमळनेर शहरापाठोपाठ आता भुसावळ शहरात देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. भुसावळात आतापर्यंत ५ करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २४ वर पोहचली असून यापैकी ९ रूग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.