आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ कार्यशाळेत गिरविले आनंदाचे धडे : प्रतापमधील अनोखा उपक्रम…!
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी
चोपडा : ‘चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित शतकोत्तर परंपरा लाभलेल्या प्रताप विद्या मंदिरात संस्थेच्या शिक्षकांसाठी आनंदाने शिकण्याच्या दिशेने या दोनदिवसीय कृतीशील व नाविन्यपूर्ण कार्यशाळेचे आयोजन दिनांक २१ व २२ जानेवारी रोजी करण्यात आले.

संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर व रुबीताई यांच्या संकल्पनेतून या अभिनव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रस्तुत कार्यशाळेसाठी पुणे येथील ‘खेळघर’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमाच्या समन्वयक तथा पालकनीती परिवारातील शुभदा जोशी व मानसी महाजन ह्या प्रमुख मार्गदर्शक तसेच साधनव्यक्ती म्हणून उपस्थित होत्या. प्रस्तुत कार्यशाळेत वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी खेळघर कोणती कार्य करते याची तोंडओळख केली.

आनंदाने शिकण्यासाठी व शिकणे बहारदार कसे करता येईल यासाठी विविध भाषिक खेळ, गाणी, मुलांचे अवधान खेचण्यासाठीच्या विविध क्लृप्त्या वापरून शिक्षण बालकेंद्री कसे करता येईल याचे प्रत्यक्ष डेमो दाखवून, शिक्षकांचा कृतीयुक्त सहभाग नोंदवून, कार्यशाळा अनुभवांशी जोडून, ज्ञानरचनावादाच्या रचनेसाठी शैक्षणिक अनुभव कसे सकस व दर्जेदार बनवता येतील अशा वातावरण निर्मितीतून प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या भावनांना मा. शुभदा जोशी यांनी हात घातला. सकारात्मक शिस्त म्हणजे काय ? यावर देखील चर्चासत्र, शिक्षक सहभाग, वर्गातील प्रत्यक्ष येणारे केस स्टडीजच्या आधारे उत्तम संवाद साधून, रोल प्ले दाखवून सकारात्मक शिस्त कशी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी फलदायी ठरेल याचे विवेचन केले.

मा. मानसी महाजन यांनी भाषा शिक्षण साक्षरता म्हणजे काय ? लेखन वाचनाची पूर्वतयारी, भाषासंपन्न शाळा परिसर तयार करणे, भाषिक खेळ, गमतीदार गाणी यांचा प्रत्यक्ष वापर, अंकुरती साक्षरता, वाचनाचे महत्त्व व त्यासाठी प्रत्यक्ष गटकार्य, अभिवाचन कसे करावे याचे दिग्दर्शन अशा नानाविध क्लृप्त्यांचा वापर करत प्रशिक्षणात मजा आणली. प्रस्तुत प्रशिक्षणात प्रताप विद्या मंदिरातील प्राथमिक विभाग, बालवाडी विभाग,दिल्लीतील सर्वोत्तम बातम्या वेबसाइट इंग्लिश मिडीयम विभाग, माध्यमिक विभाग यातील सर्व शिक्षक सहभागी झाले होते. प्रताप इंग्लिश मिडीयमच्या प्रशस्त नूतन वास्तूत या अभिरुचीसंपन्न कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सचिव मा. माधुरीताई मयूर, गोविंदभाई गुजराथी, प्राथमिकचे मुख्याध्यापक सुनील पाटील, माध्यमिकचे मुख्याध्यापक प्रशांत गुजराथी, इंग्लिश मिडीयमचे प्राचार्य रजिश बालन यांचे मार्गदर्शन व डी.टी. महाजन, शरद पाटील, इंग्लिश मिडीयमचा स्टाफ यांचे सहकार्य लाभले.






