मंगरूळ फाट्याजवळ भीषण अपघात… दोन जण जागीच ठार… तीन गंभीर जखमी… तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-

चोपडा तालुक्यांतील मंगरूळ फाट्याजवळ भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. त्यात तीन गंभीर स्वरूपात जखमी आहेत त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरांतील सुंदरगढी भागांतील चार व्यक्ती आणि विद्याविहार कॉलनी मधील नितीन मोरे हे मध्य रात्री जळगाव हून चोपडा येण्यासाठी वाहनाची वाट पाहत होते. त्यावेळी निर्मल डेअरीची गाडी दूध पोहचविण्यासाठी जळगाव येथे आली असताना, चोपडा येण्यासाठी वाहनाची व्यवस्था नसल्याने ते पाचही व्यक्ती निर्मल डेअरीच्या वाहनात मागे बसून चोपडाकडे येत असताना मंगरूळ फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मागून निर्मल डेअरीच्या वाहनास जोरदार धडक दिल्याने वाहनात मागे बसलेल्या पाच पैकी दोन जण त्यात गणेश काशिनाथ देशमुख वय – २९ रा. सुंदरगढी व नितीन दामोदर मोरे वय – ४५ रा. विद्याविहार कॉलनी हे दोघे जागीच ठार झाले आहेत तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. चुनीलाल काशिनाथ देशमुख, महेंद्र पांडुरंग देशमुख, नितीन अरुण देशमुख हे तिघे जण गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत.




चोपडा तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच आहे.काही दिवसांपूर्वी रेलच्या मारोती जवळ कंटेनरच्या धडकेत मामा व भाची जागीच ठार झाले होते . चोपडा – यावल रस्त्यावरील देविनी पेट्रोल पंपा जवळ ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने मोटार सायकल सह मनोहर पाटील ( कृषी सहाय्यक ) ट्रकच्या खाली आल्याने त्यांचा जागीच दुर्दैव मृत्यू झाला होता. यांसह अशा अनेक अपघात तालुक्यांत सातत्याने घडत आहेत.

चोपडा तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच आहे .रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने खड्डे वाचवण्याचा प्रयत्नात चालकांचा वाहनांवरील ताबा सुटल्याने अशा घटना घडत असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये चर्चिली जात आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने जातीने लक्ष घालून तातडीने रस्त्यांवरील खड्डे बुजवून अपघातांची मालिका थांबवावी अशी मागणी होत आहे.