मालेगाव:- अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्याने मृताच्या नातेवाईकांनी मालेगावातील सामान्य रुग्णालयात गोंधळ घातला. आज सामान्य रुग्णालयात उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने एक रुग्ण अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल झाला होता. त्यावर उपचार सुरू झाले अन लगेचच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळात अतिदक्षता विभागातील वस्तूंची तोडफोड करण्यात येऊन रुग्णालयातील स्टाफलाही धक्का बुक्की करण्यात आली. या घटनेमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली असून रुग्णालयातील कर्मचारी संपावर जाण्याचा निर्णय घेत असल्याचे समजते.
मालेगाव शहर हे राज्यातील नवीन कोरोना हॉटस्पॉट बनलं आहे. दिवसेंदिवस शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून मालेगावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७७ वर जाऊन पोहोचली आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण १४ परिसर कँटोमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे सर्व भाग सील करण्यात आले आहेत.
शहरात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने जिल्हाप्रशासनाची चिंता वाढली असून ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत त्या भागात सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी २५० पथक स्थापन करण्यात आले आहेत. तसेच युद्धपातळीवर काम करण्यात येत आहे.