सावधान! मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड प्रांताधिकारी श्रीमती सीमा अहिरे यांचे आदेश

चोपडा(प्रतिनिधी)-जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे.कोरोना विषाणूचा प्रसार भारतात,महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यामध्ये होत आहे.त्या अनुषंगाने राज्य सरकारने साथीचा रोग प्रतिबंधक कायदा १८९७ लागू करून खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेल्या आहेत.

.त्यानुसार अमळनेर उपविभागातील अमळनेर व चोपडा तालुक्यातील सर्व नागरिकांना मास्कचा वापर करणे अनिवार्य असल्याचे आदेश प्रांताधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी श्रीमती सीमा अहिरे यांनी दि.१२ एप्रिल २०२० रोजी क्र. स्वीस/कवि/१३८/२०२० च्या पत्रानुसार दिले आहेत.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास साथ रोग प्रतिबंध अधिनियम १८९७ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भादवी १८०७ चे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित व्यक्तीस ५०० रुपये दंड वसूल करून तो मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९ यासाठी जमा करणे बंधनकारक राहील असेही या आदेशात म्हटले आहे.त्यामुळे सावधान!मास्क वापरा नाहीतर दंडात्मक कारवाईला सामोरे जा हे आता निश्चित!