घराकडे पायी प्रवास करणाऱ्या मजुरांची अमर संस्थेने केली जेवणाची व्यवस्था

चोपडा:-(प्रतिनिधी) ——–
कोरोना या महामारीने लॉकडाऊनची परिस्थिती देशात निर्माण झाली आहे.जे लोक विविध शहरांमध्ये कामासाठी गेले होते. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने ती लोक आता घराकडे पायी चालत निघाली आहेत. अशा लोकांकडे ना अन्न आणि ना पाणी .लॉक डाऊन झाल्यामुळे सरकारने सर्व वाहतूक बंद करून ठेवली आहे.अशा परिस्थितीत लोकांना रेल्वे, बस,खासगी वाहन न मिळाल्याने हजारो मजूर वर्ग शेकडो किलोमीटर अंतर पायी चालत आपल्या गावाकडे निघाले आहेत.
कोरोनाचा संकटामुळे हातात पिशवी डोक्यावर मूल ,चेहऱ्यावर भीती आणि मनात अनेक विचार घेऊन जामनेर,नेरी, शेंदूर्णी या परिसरातून सुमारे २४ मजूर आपल्या बडवानी (मध्यप्रदेश) येथे आपल्या लेकराबाळासोबत पायीच निघाल्याचे विदारक चित्र वेले ता.चोपडा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते महेंद्र शेटी यांनी पाहिले. या मजुरांचा घोळका आज गुरुवारी सकाळी ९:३० वाजता वेले गावात पोहचला .महेंद्र शेटी यांनी अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ही फोनवर माहिती दिली. चंद्रकांत पाटील सामाजिक बांधिलकी जपत त्या सर्व मजुरांना आपल्या अमर संस्थेच्या बालकाश्रमात घेऊन या अशी सूचना केली . वेले येथील आश्रमात चंद्रकांत पाटील संस्थेचे उपाध्यक्ष मनोज चित्रकथी ,सचिव दिपक जोशी यांनी त्यांची जेवणाची व्यवस्था केली. जेवणात त्यांना वरण, भात, पोळी ,भाजी,बर्फी त्यांना जेऊ घातले.त्यांच्यासोबत असलेल्या मुलांना बिस्किटाची पुडे त्यांच्या हातात दिले व पुढील प्रवासासाठी ११:३०वाजेच्या सुमारास निघाले .बालगृहाचे व्यवस्थापक शेषराव पाटील , श्रीकांत पाटील , निलेश चौधरी ,बाळू कोळी,सुजता नेवे यांनी परिश्रम घेतले.